पुस्तक : गोष्ट छोटी डोंगाएवढी!
लेखक : अरविंद जगताप
प्रकाशक : इंडियन भारत पब्लिकेशन
पाने : १८०
भाषा : मराठी
साहित्य प्रकार: कथा संकीर्ण
वाचक : सर्व वयोगटातील
अरविंद जगताप हे चला हवा येऊ द्या या मालिकेतून पोस्टमन काकांनी लिहिलेल्या पत्रातून घरघरात आणि मनामनात पोहचले आहेत. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९७७ रोजी झाला. ते एक कवी आणि लेखक आहेत. त्यांनी अनेक एकांकिका आणि चित्रपट कथा लिहिल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक चित्रपटात गाणी लिहिली आहेत. अनेक मराठी मालिकांमध्ये संभाषण लेखन देखील केले आहे.
त्यांच्या लेखनाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नसून त्यातून एखादा उपदेश पोहचवण्याचा त्यांचा प्रयत्न वाचन करताना जाणवतो. ग्रामीण भागातील जीवन आणि वस्तुस्थिती, राजकारणातील मुद्दे असा अनेक मुद्दे ते कळवळून मांडतात. त्यांची त्याच्या लिखाणाची एक वेगळीच शैली निर्माण केली आहे.
गावाचे चित्र म्हटले की एक घर, जवळून वाहणारी नदी, पाठीमागे डोंगर, आकाशात उडणारे पक्षी हटकून दिसत असे; पण गावचे शहरीकरण होऊ लागले, ग्रामविकासाच्या नावाखाली ग्रामसंस्कृतीचा विसर पडला अन गावचे गावपण हरवले. अशा गावांच्या, गावकऱ्यांच्या गोष्टी अरविंद जगताप यांनी ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी!’मधून सांगितल्या आहेत.
कोळेवाडीतील जनार्दन हा नाचकाम करणाऱ्या रेखाचा मुलगा. सैन्यात असताना दहशतवाद्यांचा खात्मा करताना तो धारातीर्थी पडतो. त्याची जात माहित नसल्याने कोणत्या जातीच्या स्मशानात त्याच्यावर अंतिमसंस्कार करायचे, हा प्रश्न ‘अमर राहे!पण कुठे’ या कथेतील गावकऱ्यांना पडतो. ‘सोनामावाशी’चे लग्न झाल्यावर पाऊस पडल्याने तिला बायका देवी मानायच्या. पतीच्या मागे तिने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले; पण मुले मात्र नोकरीनिमित्त शहरात गेल्यानंतर आईला विसरले. गावातील राजकारणाचा बळीचा बकरा ठरलेला शंकर घाडगे, आमदारांचा राइट हँड असलेल्या दीप्याचे भवितव्य, स्मार्टफोनच्या आहारी गेलेल्या विन्याने मैत्रिणीला सन्मार्गावर आणण्यासाठी लढविलेली ‘स्मार्ट’ शक्कल, अशा अनेक छोट्या-छोट्या गोष्टींमधून डोंगराएवढा आशय समोर येतो.
त्यांच्या या पुस्तकात वाचक अगदी गुंतून जातो. त्यांनी लिहिलेले प्रसंग डोळ्यासमोर उभे राहतात. आपण त्या भावना जगतोय असा भास होतो आणि शेवटी आपण त्यांच्या कथेतून मनोरंजन घेता घेता एक शिकवण घेऊन कधी बाहेर पडतो ते कळत देखील नाही. त्यांच्या शब्दांमध्ये नक्कीच एक किमया आहे.
मला खात्री आहे की हे पुस्तक नक्कीच आवडेल तुम्हाला!पुन्हा अशाच एका नव्या पुस्तकाची समीक्षा घेऊन येईल.
Till then, HAPPY READING
-Shubham
©TheSDspeaks